प्रवासी घालतात वाद : नियमित देखभाल करण्याची नाही सोयदयानंद पाईकराव - नागपूरआधुनिकतेची कास धरीत एसटी महामंडळाने वाहकांना तिकीट देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिल्या. परंतु या मशिनची देखभाल होत नसल्याने प्रवासात मशीन बंद पडणे, तिकिटाची रक्कम नीट न उमटणे, बसमध्ये चार्जिंग उपलब्ध नसणे या समस्या वाहकांना भेडसावत आहेत. यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालीत आहेत. पैसे नीट न उमटल्यामुळे हाताने रक्कम लिहून दिल्यास मार्ग तपासणी पथकाचे अधिकारी वाहकावर कारवाई करीत असून, दुहेरी संकटाचा सामना वाहकांना करावा लागत असून, ते अक्षरश: वैतागले आहेत. एसटीचे वाहक पूर्वी प्रवाशांना आपल्या ट्रेमधील तिकीट काढून ते पंचिंग करून देत असत. कालांतराने महामंडळाने वाहकांना ‘ईटीआयएम’ उपलब्ध करून दिल्या. नागपूर विभागात ट्रायमॅक्स कंपनीच्या एकूण ९७८ ‘ईटीआयएम’ उपलब्ध करून देण्यात आल्या. काही काळ या मशिन्स योग्यरीत्या चालल्या. परंतु त्यानंतर या मशिन्सची नियमित देखभाल होत नसल्यामुळे यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले. वाहक शेड्यूलसाठी निघताना त्याला ‘ईटीआयएम’ देण्यात येते. ही मशीन पूर्णपणे चार्जिंग केलेली नसते. विभागात जेवढ्या ‘ईटीआयएम’ आहेत तेवढे चार्जर नसून १० टक्के चार्जरचा तुटवडा आहे. यामुळे ऐन प्रवासात या मशीन बंद पडतात. ट्रायमॅक्स कंपनीच्या कागदाची क्वॉलिटी निकृष्ट असल्यामुळे प्रिंट देताना कागद अडकून एकाच ठिकाणी प्रिंट होते. रक्कम नीट न उमटल्यामुळे प्रवासी वाहकांशी वाद घालतात. हाताने रक्कम लिहून दिल्यास मार्ग तपासणी पथकातील अधिकारी वाहकावर कारवाई करतात. मशिनची गतीही कमी असल्यामुळे एसटीच्या विविध प्रकारच्या सवलतीच्या पासेसची नोंदही मशीनमध्ये घेणे शक्य होत नाही. या सर्व प्रकारामुळे एसटीचे वाहक ड्युटी बजावताना कमालीचे त्रस्त झाले आहेत. यावर महामंडळाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ते करीत आहेत.लक्ष वेधूनही तोडगा नाही‘अनेक वाहकांकडून मशीनबाबत युनियनकडे समस्या आल्या आहेत. ट्रायमॅक्स कंपनीच्या मशीन निकृष्ट दर्जाच्या आहेत. आंध्र प्रदेशातील बालाजी कंपनीच्या मशीन चांगल्या असून त्या मशीन महामंडळाने पुरविल्यास या समस्या निर्माण होणार नाहीत. वाहकांना येणाऱ्या समस्यांकडे युनियनने महामंडळाचे लक्ष वेधले तसेच ट्रायमॅक्स कंपनीशी चर्चा केली. परंतु त्यातून काहीच तोडगा निघाला नाही.’ सुभाष वंजारी, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
‘ईटीआयएम’मुळे वैतागलेत एसटीचे कंडक्टर
By admin | Updated: August 1, 2014 01:13 IST