विजय मानकर
ऑनलाइन लोकमत
सालेकसा (गोंदिया), दि. २० - नागझिरा-नवेगावसारखा व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता पर्यटकांना सर्वाधिक भुरळ घालत आहे तो हाजरा फॉल. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील दरेकसा या शेवटच्या रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या हाजराफॉल या धबधब्याला सध्या उधान आले आहे. पहाडातून खाली कोसळणाºया पांढºयाशुभ्र पाण्यासह त्या ठिकाणी नव्याने निर्माण केलेले विविध साहसी खेळ मुलांसह मोठ्यांच्याही आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
या ठिकाणी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. सुटीच्या दिवशी तर हे ठिकाण पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे. कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्गासाठी तर हे ठिकाण खास ‘विकएंड स्पेशल’ पर्यटन स्थळ झाले आहे. या महिन्यात लागून आलेल्या सुट्यांमुळे तर हाजरा फॉलमध्ये पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. १५ आॅगस्टला एकाच दिवशी १२ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावून नवीन विक्रम स्थापित केला. पर्यटकांना येथे प्रवेश करण्यासाठी संगणकीय प्रवेश पास दिल्या जात असल्यामुळे पर्यटकांची निश्चित संख्या नोंद केली जाते.
मुंबई-कोलकाता मुख्य रेल्वे लाईनसाठी खोदलेल्या बोगद्यामुळे तयार झालेला हा धबधबा तत्कालीन इंग्रज अभियंता ‘हाजरा’ यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. त्यामुळे या धबधब्याला हाजरा फॉल असे नाव पडले. तीन वर्षापूर्वीपर्यंत या ठिकाणी पर्यटक कमी आणि प्रेमी युगलच जास्त येत होते. त्यातूनच अनेक युवक पाण्यात उतरण्याचे धाडस दाखवून जीव गमावून बसले आहेत. मात्र आता स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे ५० गार्ड या ठिकाणी तैनात असल्यामुळे दोन वर्षात कोणतीही दुर्घटना झाली नाही.
सुटीच्या दिवशी पर्यटकांचा ओढा लक्षात घेता आता या परिसराचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान प्रसंग पाहून वन विभागाचे अतिरिक्त मनुष्यबळ येथे वापरत आहेत.
साहसी खेळात झिप लाईनची भर
- या ठिकाणी पर्यटकांना पहाडातून वेगात पडणाºया धबधब्याचे आणि त्यातून उडणाºया तुषारांचे आकर्षण तर आहेच. पण आता साहसी खेळ विशेष आकर्षण झाले आहे. या ठिकाणी कमांडो नेट, मल्टीवाईन ब्रिज, व्ही शेप ब्रिज, ब्रह्मा ब्रिज, ग्राऊंड बॉल, व्हॉलीबॉल, मचान यासोबत आता एका पहाडावरून दुसºया पहाडावर धबधब्यासमोरून तारेने लटकत जाण्यासाठी तयार केलेली ४०० मीटरची झिप लाईन विशेष आकर्षण झाली आहे. निसर्गरम्य हिरवेगार जंगल, जवळच असलेला रेल्वेचा बोगदा यामुळे पर्यटकांना येथे दिवस कसा संपतो याचा अंदाजच लागत नाही.
पालकमंत्र्यानीही घेतला हाजराफॉलचा आनंद
- गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वातंत्र्यदिनी दुपारनंतर हाजरा फॉलची वाट धरली. हजारो पर्यटकांचा उत्साह बघत त्यांनाही हाजराफॉलला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही. तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटून नवीन उर्जा घेण्यासाठी त्यांच्यासोबत आ.संजय पुराम आणि इतर पदाधिकारी व अधिकारीही होते. या ठिकाणी आणखी सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या.