Maharashtra Local Body Election 2025: राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना बुलढाण्यात बोगस मतदानावरून मोठा गदारोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दीड तासातच २ बोगस मतदार पकडण्यात आले, ज्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्समधील तांत्रिक बिघाड, तर दुसरीकडे मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत असताना, बुलढाण्यातील प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला.
गांधी शाळेत बोगस मतदारांचा डाव फसला
बुलढाणा नगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. कोथळी येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा बसवण्याचा डाव टळला आणि तो व्यक्ती जाळ्यात अडकला. पोलिसांनी या व्यक्तीसह अन्य एका व्यक्तीलाही बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नावरून ताब्यात घेतले आहे.
बोगस मतदारांना पकडल्यानंतर काँग्रेसने मोठा आरोप केला आहे. कोथळी, इब्राहिमपूरसह घाटाखालून खासगी वाहनांमधून दोन गाड्या भरून लोकांना बोगस मतदानासाठी बुलढाण्यात आणले गेले, असा दावा काँग्रेस उमेदवारांनी केला आहे. काँग्रेसचे उमेदवार दत्ता काकास यांनी केलेल्या आरोपाने या प्रकरणाचे गांभीर्य वाढवले आहे. नगरपरिषद निवडणुकीत बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होत आहे. या गैरप्रकाराचे व्हिडिओ पुरावे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा त्यांनी केला.
"घाटाखालून मतदार बोलावले जात असतानाही पोलिस प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या संगनमताने किंवा अक्षम्य दुर्लक्षामुळे झाला आहे," असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून मतदान केंद्राबाहेर मोठा राडा झाला. यावेळी एक बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटला. शिवसेना आमदाराच्या पुत्राचा एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यात बोगस मतदाराला पळवून लावण्याची घटना कैद झाली आहे.
जवळपास १० वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता आहे. अशा उत्साहाच्या वातावरणात बोगस मतदानाच्या या गंभीर प्रकरणाने बुलढाण्यात वातावरण आणखी तापलं आहे.
Web Summary : Buldhana witnesses uproar during local elections as bogus voters are caught. One escapes police custody, with allegations against an MLA's son for aiding the escape. Congress alleges widespread fake voting, accusing authorities of negligence amidst EVM glitches and voter list errors.
Web Summary : बुलढाणा में स्थानीय चुनावों के दौरान बोगस मतदान का खुलासा। एक बोगस मतदाता पुलिस हिरासत से भागा, विधायक के बेटे पर आरोप। कांग्रेस ने व्यापक फर्जी मतदान का आरोप लगाया, ईवीएम त्रुटियों और मतदाता सूची की गड़बड़ियों के बीच अधिकारियों पर लापरवाही का आरोप लगाया।