वर्धा : एका विद्यार्थ्याने अश्लील वर्तन केल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीवरच प्रशासनात्मक कारवाईचा बडगा उगारल्याच्या निषेधार्थ संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारपासून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पीडितेच्या तक्रारीनुसार, २८ जून ते १ जुलै या कालावधीत विभागाच्या परवानगीने युजीसी (नेट) परीक्षा व शोध प्रबंधासाठीची माहिती संकलित करण्यासाठी ती गोवा विद्यापीठात गेली होती. विद्यापीठातील साहित्य विभागाचा विद्यार्थी संजीवकुमार झा आणि अलाहाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी विरेंद्र प्रताप सोबत होते. तिघेही विश्राम भवनात थांबले होते. ३० जून रोजी तिघे विद्यापीठाच्या गं्रथालयातील कामे आटोपून कलंगुट बीचवर फिरायला गेले. त्याठिकाणी संजीवकुमार झा मद्याच्या नशेत गैरवर्तन करु लागला. त्याने अश्लील शब्दांत शारीरिक संबंधाची मागणी केली. त्याने विरेंद्रलाही मारहाण करून शिवीगाळही केली, अशी तक्रार विद्यार्थिनीची आहे.गोवा अपरिचित असल्यामुळे तिथे याप्रकरणी पोलिसात तक्रार केली नाही. विद्यापीठाकडून न्यायाची अपेक्षा होती. तेथून परतताच प्रकरणाचे गांभीर्य विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, मात्र काहीही कारवाई झालेली नाही, असा विद्यार्थिनीचा आरोप आहे. आरोपीविरुद्ध कारवाई न करता पीडितेवरच कारवाई करण्याची तयारी विद्यापीठ प्रशासनाने चालविली असून या विरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कक्षापुढे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कुलगुरूंच्या कक्षाबाहेर ठिय्या
By admin | Updated: November 18, 2014 02:12 IST