Vaishnavi Hagawane Case, Pune Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याच्या घरात सून वैष्णवी शशांक हगवणे हिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आपले आयुष्य संपवले. जमीन खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणायला लावण्यासाठी तिला खूप मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरा व दीर फरार आहेत. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी खरमरीत टीका केली आहे.
"आपल्या महिला आयोगाचा कारभार हा असा आहे 'वराती मागनं घोडं'. बरं, बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत. कालपरवा छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती, पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले. त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की 'दाल में कुछ काला है !' ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेली प्रतिक्रिया आहे का? हा प्रश्न आमच्या मनात आहे," असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
"वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत. या अर्थ असा की, सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे." अशी खरमरीत टीका खडसे यांनी केली.
दरम्यान, वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडी २६ मे पर्यंत वाढवण्यात आवी आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे अद्याप मोकाट आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.