मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जुने जोखड सोडून तंत्रस्नेही वापर वाढविला आहे. त्याचा परिणामही त्यांना दिसून येत आहे. संघाची अधिकृत वेबसाइट www.rss.org च्या जॉइन आरएसएस या आॅप्शनच्या माध्यमातून संघाला तब्बल एक लाख नवे स्वयंसेवक मिळाले आहेत. या एक लाख नव्याने सामील झालेल्या लोकांमध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, बँकर यांच्यासह अन्य क्षेत्रांतील लोकांचा समावेश असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोढ, प्रांत प्रचारक अभिजीत गोखले, प्रांत प्रचारप्रमुख प्रमोद बापट यांचीही उपस्थिती होती.मुंबईपासून कोकणापर्यंत पसरलेल्या प्रांतात ७ जानेवारी २०१८ रोजी हिंदू चेतना संगम आयोजित करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरविले आहे. रोज सुमारे १ हजार लोक या कार्यक्रमासाठी नोंदणी करत असल्याचेही सांगण्यात आले. संपूर्ण देशाचा विचार करता शाखांची संख्या ५७ हजार १८५ तर आठवडा मिलनाची संख्या १४ हजार ८९६ आहे. या आकडेवारीमध्ये २०१२ नंतर तब्बल २ हजार शाखांची भर पडली आहे. कोकण प्रांतात होणाºया हिंदू चेतना संगममध्ये सुमारे सव्वा लाख स्वयंसेवक विविध ठिकाणी सहभागी होतील, अशी आशा संघाकडून व्यक्त करण्यात आली.
‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:46 IST