पॅटर्न बदलला : कठोर नियमांचे पालननवी दिल्ली : केंद्रीय सनदी सेवा परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या परीक्षार्थ्याला अवघे ५३ टक्के गुण मिळाले आहेत. परिणामी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देणाऱ्यांची गुणवत्ता घसरली की गुणांची अवास्तव सूज उतरली, याची चर्चा सुरू होणे अटळ आहे. निवडीसाठी बदललेला पॅटर्न आणि आखलेले कठोर निकष घसरलेल्या गुणांसाठी कारणीभूत ठरले आहेत. यंदाचे गुण लक्षात घेता कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा ४५ टक्क्यांचा निकष लावला असता तर मोजकेच परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असते! आयोगाने गुणवंत विद्यार्थ्यांचे गुण जाहीर केले आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि न ठरलेल्या उमेदवारांच्या गुणपत्रिका जारी करण्यात आल्या आहेत. सनदी सेवा परीक्षा दरवर्षी तीन स्तरात घेतल्या जातात. प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत या टप्प्यांमधून आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि अन्य उमेदवारांची निवड केली जाते. यंदा पहिले तिन्ही स्थान महिलांनी पटकावले आहे. भारतील महसूल सेवेतील (सीमा आणि अबकारी शुल्क) दिल्ली येथील अधिकारी इरा सिंघल यांनी २०२५पैकी एकूण १०८२ गुण (५३.४३ टक्के) मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. त्यांनी अपंगत्वावर मात करीत घेतलेली भरारी लक्षवेधी ठरली. मुख्य परीक्षा १७५० तर मुलाखत २७५ गुणांची होती. केरळच्या डॉक्टर रेणू राज यांनी दुसरे १०५६ (५२.१४ टक्के) तर निधी गुप्ता यांनी १०२५ (५०.६१ टक्के) तिसरे स्थान मिळविले. ४ जुलै रोजी हा निकाल जाहीर झाला.
यूपीएससी टॉपरला फक्त ५३ टक्के
By admin | Updated: July 22, 2015 01:44 IST