Prataprao Jadhav On GBS: गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यभरात जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेकजण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहेत. जीबीएसच्या अनेक रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता राज्यातील यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही यासंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. जर हा आजार संसर्गजन्य असल्याचं समोर आलं तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील असंही प्रतापराव जाधव म्हणाले.
"जीबीएसचे रुग्ण सर्वत्र सापडायला लागले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय अतिशय तत्परतेने काम करत आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली आहे. जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचं किंवा संसर्गजन्य असल्यास तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल," असं प्रतापराव जाधव म्हणाले.
जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचे कारण कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरतोय. जीबीएस सामान्यतः व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते.
मांस शिवजवून खावे - अजित पवार
"जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नागरिकांनी कच्चे मांस खाल्ल्याने या आजाराची बाधा झाल्याचे कारणही समोर आले आहे. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे. कोंबड्यांचे मांस खाल्याने हा आजार होत असला तरी कोंबड्यांना मारून टाकण्याची किंवा जाळून टाकणं असे करणे आवश्यक नाही. नागरिकांनी कच्चे मांस न खाता ते चांगल्या प्रकारचे शिजवून मगच खावे," असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.