मध्यरात्री गावातील शौचालय अचानक गायब केले; सकाळी उठताच ग्रामस्थ हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:09 PM2022-03-27T21:09:34+5:302022-03-27T21:10:15+5:30

अज्ञात व्यक्तीविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Unidentified persons demolished a toilet in Rashiwade in Kolhapur | मध्यरात्री गावातील शौचालय अचानक गायब केले; सकाळी उठताच ग्रामस्थ हैराण झाले

मध्यरात्री गावातील शौचालय अचानक गायब केले; सकाळी उठताच ग्रामस्थ हैराण झाले

Next

राशिवडे :  येथील मारुती मंदिराजवळ जवळ सरकारी जागेत असणारे स्वच्छतागृह (मुतारी) अज्ञात व्यक्तीने जमीनदोस्त करून साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वच्छतागृह पाडल्यामुळे ग्रामपंचायतीचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञात व्यक्तीविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मारुती मंदीराजवळील शांतिनाथ लोखंडे व महादेव मगदूम यांच्या घराशेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत अनेक वर्षापासून स्वच्छतागृह आहे.  काल रात्री अज्ञातांनी हे स्वच्छतागृह पाडून साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. 
ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच रंगराव चौगले, ग्राम विकास अधिकारी विराज गणबावले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात सुमारे तीन लाखाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. अज्ञातांनी हे साहित्य परस्पर गावातील माळावर टाकल्याचे पंचनामा करताना निदर्शनास आले.
याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

राशिवडे येथे दोन स्वच्छतागृहे आहेत. मोठी बाजारपेठ असल्याने आणखी दोन ते तीन स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे. स्वच्छता गृहे नसल्यामुळे बाहेरून येणारे व्यापारी, प्रवाशांची कुचंबणा होत आहे. याबाबत  ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा सुरू आहे. अशातच  यातील एक स्वच्छता गृह अज्ञातांनी पाडल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञातांनी हे स्वच्छतागृह पाडताना पूर्णपणे काळजी घेतल्याचे दिसून येते. चौकातील स्वच्छता गृह जमीनदोस्त करताना मध्यरात्रीची वेळ निवडण्यात आली. मात्र या मार्गावर असणाऱ्या दोन सीसीटीव्ही त्यांचे कृत्य कैद झाले असण्याची शक्यता आहे.

मुतारी चोरीला गेल्याची सोशल मिडियावर चर्चा

आज सकाळपासून या घटनेची सोशल मिडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. कोणी मुतारी चोरीला गेल्याची चर्चा करत आहे तर कोणी गटर बांधण्यासाठी माळावर नेवून ठेवली आहे अशी चर्चा करताना दिसत आहे. मराठी सिनेमात विहीर चोरीला गेल्याचे पाहिले आज प्रत्यक्ष अनुभवल्याचे सोशल मिडियावर लिहिले जात आहे.

Web Title: Unidentified persons demolished a toilet in Rashiwade in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.