नेरळ : कर्जत तालुक्यातील कर्जत - मुरबाड राज्यमार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठ्या अवजड वाहनांची रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्किंग केली जात आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस अनधिकृत अवजड वाहने पार्ककेली जात आहेत. त्यामुळे येथे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांनी उपस्थित केला आहे. कर्जत - मुरबाड रस्त्यावर कळंब ते पोही फाटा दरम्यान दररोज मोठमोठे मालवाहू कंटेनर रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे केले जात आहेत. असे असताना हाकेच्या अंतरावर कळंब परिसरात पोलीस चौकी असताना देखील पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले आहे, असे कळंब ग्रामस्थांचे म्हणणे असून पोलिसांनी याकडे लक्ष घालून रस्त्याच्या दोन्ही कडेला पार्क केल्या जाणाऱ्या कंटेनरवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मंगळवारी याच मार्गावर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दहा ते बारा कंटेनर उभे करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंटेनर उभे केल्याने एका वेळेस एकच गाडी रस्त्याच्या मधून जात होती आणि त्यामुळे काही काळ येथे वाहतूककोंडीही होत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.कळंब येथे नेरळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक चौकी उभारण्यात आली आहे. येथे चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना येथील अनधिकृत पार्किंगवर मात्र पोलिसांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न कळंब ग्रामस्थांनी उपस्थित केला असून लवकरात लवकर येथे उभ्या करण्यात येत असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
कर्जत-मुरबाड रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग
By admin | Updated: March 2, 2017 03:05 IST