ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सत्कार करण्यात आला होता. यावेळी पवारांनी शिंदेंचे कौतुक केल्याने उद्धव ठाकरे गटाला मिरच्या झोंबल्या होत्या. संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली होती. यावर शरद पवार राष्ट्रवादीचे आणि शिंदे शिवसेनेचे नेतेही प्रत्यूत्तर देत होते. आता त्याहून खळबळजनक माहिती येत आहे. या सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचा एक खासदार आलेला, असे समोर येत आहे.
शरद पवारांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जायला नको होते, असे सांगणारे संजय राऊत आता या खासदाराच्या उपस्थितीवर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेंसोबत जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी वृत्त आले होते. यानंतर ठाकरे सेनेने या खासदारांनाच एकत्र करत पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. या घडामोडींवर पडदा पडत नाही तोवर शिंदेंच्या सत्कार सोहळ्यालाच ठाकरे गटाचा खासदार उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील हे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. स्टेजवर न जाता ते खाली उपस्थितांत बसले होते. या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे ट्विटही त्यांनी एक्सवर पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा उल्लेख केला आहे, परंतू एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला आहे. ''महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्मविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.'', असे त्यांनी म्हटले आहे.