Udayanraje Bhosale, Nagpur Violence: औरंगजेबाची कबर हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यावर उतरला. यात काहींनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्कीही केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनाही आवश्यक ती कारवाई करावी लागली. या राड्यात उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांना दुखापत झाली. या घटनेवरून विविध ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या प्रश्नावरही स्पष्टपणे बोलले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्याच मित्रपक्षांचे लोक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी उदयनराजेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, "असे अजिबात नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये दंगली मोठ्या प्रमाणावर होत होत्या. त्यामानाने आता दंगली घडवणाऱ्यांना आळा घालण्यात आला आहे. पण जे लोकं दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतात ते कुठल्याही पक्षाचे किंवा जातीधर्माचे नसतात, ते व्यक्तिकेंद्रित असतात. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ते लोक अशा गोष्टी करतात. ही विकृती ठेचण्याची जबाबदारी एखाद्या पक्षाची नसून देशातील प्रत्येक नागरिकांची आहे."
"दंगल घडवून आणावी अशी सामान्य माणसाची इच्छा नसते. काही समाजकंटक मुद्दाम वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी अशा घटना घडवून आणतात. जे लोक दंगली करतात त्यांना कुठलाही पक्ष, कुठलीही जात किंवा धर्म नसतो. हे सर्व लोक व्यक्तिकेंद्रित प्रकारचे असतात. त्यामुळे सामान्य माणसांनी शांतता राखावी," असे आवाहन त्यांनी केली.