पुणे - मराठी भाषा आणि मराठी माणसांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. पुण्यातील विश्व मराठी संमेलनात सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासमोर मागणी केली.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, गेल्या २ महिन्यापासून महाराष्ट्रात जे प्रकार घडतायेत. आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो. राज्यात प्रत्येक जाती धर्माची माणसे राहतात. तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषाही आणतो. या भाषेचा आदर आपण नेहमी केला आहे. पाहुणचार आपण केलेला आहे. आपण त्यांच्या भाषेचा अनादर केला नाही. भविष्यात कुठलाही महाराष्ट्रातील युवक त्यांच्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. कठोर शासन केले पाहिजे ही महाराष्ट्रातील मराठी युवांची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, अस्मिता जपण्यासाठी आपण तिघांनी मिळून काहीतरी कार्यवाही करावी. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी वाढवणारे सर्व व्यासपीठावर आले आहेत. आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. ही माणसं कुठलाही निधी न घेता परदेशात मराठीचं संवर्धन करतायेत. २५ देशातील सहकारी आज इथं आले आहेत. काही लोक आमच्या विभागाकडून पैसे घेतात. मराठी माणसांच्या उद्धारासाठी हे पैसे वापरले जातात. मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणे गरजेचे आहे. मराठीचा अपमान होणार नाही याची खबरदारी शासन म्हणून आम्ही घेऊ असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान, माझी मराठी भाषा शालेय जीवनापर्यंत पोहचली पाहिजे. महाविद्यालयापर्यंत पोहचली आहे. आजच्या शोभायात्रेत १०४ संस्थांचे जवळपास ७ ते ८ हजार विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. मराठी भाषा टिकवणे, मराठी भाषेची अस्मिता टिकवणे आणि मराठी भाषेवर आक्रमण होत असेल तर त्याला आक्रमकपणे उत्तर देणे ही जबाबदारी युवा पिढीने हातात घेतली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी मराठी लिहिली, मराठी भाषा वाढवली त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असंही मंत्री उदय सामंत यांनी केले.