नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जीएमआर आणि एमआयएएल (जीव्हीके) दोन कंपन्यांनी आर्थिक निविदा सादर केल्या आहेत. यापैकी जीव्हीकेची निविदा सर्वोत्तम ठरली आहे. त्यामुळे विमानतळाचे विकासक म्हणून जीव्हीकेचीच निवड निश्चित मानली जात आहे. असले तरी याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळावर असणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सिडकोने ५ फेब्रुवारी २0१४ रोजी जागतिक निविदा काढल्या होत्या. या पात्रता फेरीत जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झुरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या कंपन्या पात्र ठरल्या होत्या. पूर्व पात्रता फेरीत पात्र ठरलेल्या या कंपन्यांना आर्थिक निविदा सादर करण्यासाठी १३ फेब्रुवारी २0१७ ची अंतिम मुदत देण्यात आली होती. यापैकी जीएमआर व जीव्हीके या दोन कंपन्यांनी शेवटच्या दिवशी निविदा सादर केल्या. सोमवारी ३.३0 वाजता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या निविदा उघडण्यात आल्या. जीएमआर कंपनीने वार्षिक उत्पन्नातून १0.४४ टक्के भाग सिडकोला देण्याची तयारी दर्शविली आहे. तर जीव्हीकेने १२.६0 टक्के उत्पन्न सिडकोला देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बोली पध्दतीत जीव्हीके अव्वल ठरली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाचा विकास आणि परिचालनाचा ठेका जीव्हीकेलाच मिळेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दोन निविदा
By admin | Updated: February 14, 2017 03:52 IST