वाशिम - ट्रॅक्टरसाठी घेतलेले कर्ज काही प्रमाणात फेडल्यानंतर पुढे कर्जमाफीच्या घोषणेत उर्वरित कर्ज माफ झाले. बँकेनेही तसे रीतसर कळविले; परंतु काही दिवसां पूर्वीच अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यासंदर्भात बँकेमार्फत वकिलाची नोटीस मिळाल्याने दोन शेतकरी भावंडांनी विष प्राशन केले. यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसर्याची मृत्यूशी झुंज सुरूआहे. या घटनेमुळे बँकेच्या कामकाजाबाबत शेतकर्यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सायखेडा येथील गोविंद शिवराम गावंडे यांनी सन २00४ मध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या उकळी पेन शाखेकडून ४ लाख ८४ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची नियमित परतफेड ते करीत होते. सन २00८ मध्ये ह्यपंतप्रधान पॅकेजह्णमध्ये हे कर्ज माफ करण्यात आले, अशी रीतसर माहिती गावंडे यांना कळविण्यात आली. आता तब्बल सात वर्षांनंतर जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात गावंडे कुटुंबीयांना ११ लाख ९५ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे कळवून त्याचा भरणा सात दिवसांच्या आत करण्याची ताकीद बँकेकडून देण्यात आली होती. या प्रकाराने गोविंद गावंडे यांची तरुण मुलं राजू (३५) आणि संजय गोविंद गावंडे (३0) ही चक्रावून गेली. त्यांनी बँकेचे कार्यालय गाठून चौकशी केली. ही रक्कम भरावीच लागेल, असे तेथील अधिकार्यांनी त्यांना सांगितले. या प्रकारामुळे गावंडे कुटुंब प्रचंड तणावात होते. त्यातच २५ जानेवारी रोजी राजू आणि संजय या दोन्ही भावांनी विष प्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताततडीने त्यांना रुग्णालयात हलविले; परंतु प्रकृती नाजूक असल्याने दोघांनाही अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवार, १ फेब्रुवारीला संजय गावंडे यांची प्राणज्योत मालवली, तर राजू गावंडे यांची प्रकृतीही अत्यवस्थ असल्याचे समजते.
बँकेच्या थकबाकीने दोन भावंडांनी केले विषप्राशन
By admin | Updated: February 4, 2015 01:51 IST