मेहकर (बुलडाणा) : गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह ३ चिमुकल्यांवर एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे शनिवारी पहाटे घडली. यात पत्नी व २ मुली ठार झाल्या असून, मुलगा गंभीर जखमी आहे. घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली आहे.मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे पत्नी मीना (३५), मुलगी अश्विनी (१५), अंकिता (१३) व मुलगा गोपाळ (१०) यांच्यासमवेत राहणाऱ्या समाधान शेषराव अंभोरे (४६) शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार केले. मुलाबाळांनी केलेल्या आरडाओरडमुळे शेजाऱ्यांनी धाव घेत घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना भीषण चित्र दिसले. अश्विनीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मीना व अंकिता यांचा मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोपाळ हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जानेफळ पोलिसांनी आरोपी समाधान यास अटक केली आहे. (प्रतिनिधी)
पत्नीसह २ मुलींची केली निर्घृण हत्या!
By admin | Updated: March 13, 2016 04:59 IST