ठाणे: वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस हवालदार महिलेला मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडलेला असतांना ठाण्यातील उपवन भागात दोन मद्यपी तरुणांनी चार वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोहन राजीवडे आणि सागर मांडवकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणो, पोलीसांना मारहाण करणो यासह विविध कलमांखाली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणा-यांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई उपवन परिसरात कारवाई सुरु होती. त्याचवेळी नाकाबंदीही लावण्यात आली होती. उपवन भागातच मांडवकर हा विनाहेल्मेट दुचाकी चालवित असल्यामुळे त्याला दत्तात्रय यादव, अनिल वाघ, खांडेकर, मिलिंद पंडागले या पोलिसांनी अडविले. मद्यधुंद अवस्थेतील या दोघांनी पोलिसांनाच शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. वाहतूक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतरही त्यांनी धुमाकूळ सुरुच ठेवला. वर्तकनगर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांना या मद्यपींकडून शिवीगाळ आणि मारहाण होत असताना मदतीसाठी कोणीही नागरिक पुढे आला नसल्याची खंतही पोलिसांनी व्यक्त केली. आपल्याला पोलीस व्हायचे आहे, त्यामुळे कारवाई करु नका, अशी विचित्र मागणीही दारुच्या नशेतील या तरुणांनी पोलिसांकडे केल्याचे काही पोलिसांनी सांगितले.‘‘उपवन भागात धूम स्टाईलने मोटारबाईक चालविल्या जात असल्याच्या तक्रारी असल्यामुळे त्याठिकाणी कारवाईसाठी हे पथक गेले होते. शुक्रवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास सागर मांडवकर या दुचाकी चालकाला हेल्मेट नसल्यामुळे या चौघा पोलिसांनी हटकले. तो दारुच्या नशेत होता. त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचीही कारवाई करणार म्हटल्यावर मागे बसलेल्या रोहनने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. आधी शिवीगाळ नंतर अगदी लाथांनी त्यांनी पोलिसांना मारहाण केली,’’विजय बांदेकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर, वाहतूक विभाग.
दोन मद्यधुंद तरुणांची ठाण्यात चार वाहतूक पोलिसांना मारहाण
By admin | Updated: August 5, 2016 23:11 IST