अंजली भुजबळ, नवी मुंबईदिवसातून पाच वेळा नमाज अदा करणारा सच्चा मुसलमान एक पक्का योगी आहे. कारण नमाजामध्ये ताडासन, वज्रासन, पादहस्तासन, वक्रासन यांसारखी आसने येतात. त्यामुळे मुस्लिमांनी योगाला विरोध करणे कदाचित चुकीचे आहे असे मला वाटते, असे वक्तव्य मुस्लीम योगगुरू फिरोज खान यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील बांधवांना आणि इतरांनाही सुदर्शन क्रिया, प्राणायाम, अध्यात्माचे वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्याचे काम फिरोज खान करीत आहेत. देशभरात राष्ट्रीय एकात्मता, शांतता नांदण्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांचे मत आहे. योग ही स्वत:शी आणि ईश्वराशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे. शरीर, मन, बुद्धी आणि आपल्या अस्तित्वाचे सात स्तर योगाच्या माध्यमातून एकत्र येतात. मानसिक ताण योगाच्या माध्यमातून कमी होतो आणि तो कमी झाला की शरीरातील व्याधी दूर होतात. आजच्या तरुण पिढीची समाजाशी नाळ तुटत आहे, ती या योगाच्या माध्यमातून जोडण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे फिरोज खान यांनी सांगितले.युनो संघटनेने आंतराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिल्याने भारतीय प्राचीन परंपरेचा सन्मान झाला आहे. जगभरातील ४७ मुस्लीम देशांत २१ जूनला योग दिन साजरा केला जाणार आहे. प्रत्येक मुस्लिमाने योग समजला पाहिजे, नमाज ही एक योग साधना आहे असे सांगून, सर्व समाजातील बांधवांनी हा योग दिन साजरा करून योगाचा डंका जगभरात पसरवावा, असे आवाहन फिरोज खान यांनी केले.मला सुरु वातीला वाटलं की, योगासने ही केवळ हायप्रोफाइल लोकांसाठी असतात. मात्र मी जेव्हा योगाचे प्रशिक्षण घेतले तेव्हा याचे महत्त्व कळले. मी ६५ वर्षांचा असून, योगासने करतो. यामुळे माझा मधुमेहाचा त्रास कमी झाला असून, रक्तदाब सामान्य आहे. समाजातील बांधवांनी नक्की योगासनांचे प्रशिक्षण घ्यावे. - खुर्शीद जिलानी, नगरसेवक, तालुका अंबडयोगासने ही मुस्लिमांसाठी नसून केवळ गैरमुस्लीम बांधवांसाठी आहे अशी माझी धारणा होती, मात्र फिरोज खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर मला योग समजला. १,४५० वर्षांपूर्वी पैगंबरांनी नमाज शिकविला त्यात अनेक आसने आहेत. ती केवळ आजच्या पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे. योगासने सर्वांनीच करणे गरजेचे आहे. - फहीम शेखफिरोज खान आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. माझा फिरोज खानला यासाठी पहिल्यापासून पाठिंबा आहे. आज भारतात ५०० जाती असल्या तरी मी स्त्री आणि पुरु ष या दोनच जाती मानतो. कुराण व ज्ञानेश्वरांचे पसायदान एकच शिकवण देतात ती समजणे गरजेचे आहे. - फकरु द्दीन शहाबुद्दीन, फिरोज खान यांचे आजोबा आणि माजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद, अंबडदहा वर्षांपूर्वी अंबडमध्ये युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर झाले तेव्हा आम्हाला फिरोज खान हा हिरा सापडला. हा एकमेव मुस्लीम विद्यार्थी या कोर्सला होता. त्यांच्या मनाची स्थिती, जिद्द याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ते आज या योगासनांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. मी यांचा गुरू आहे याचा अभिमान आहे. - जयंत भोळे, योग प्रशिक्षक, आर्ट आॅफ लिव्हिंगमी आयटीआयचा विद्यार्थी आहे. मला योगप्रशिक्षणामुळे ऊर्जा मिळाली असून माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. स्वत:ची कामे मी स्वत: करायला शिकलो आहे.- शेख हर्षद जिलानी, विद्यार्थी
नमाज अदा करणारा सच्चा मुसलमान; एक पक्का योगी
By admin | Updated: June 19, 2015 23:49 IST