Baba Adhav Passes Away: सत्यशोधक समाजवादी विचारांचे खंदे समर्थक, असंघटित मजुरांचे आधारस्तंभ आणि एक गाव एक पाणवठा चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढावयांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा शेवट मानला जात आहे. हमाल, मजूर, कष्टकरी आणि लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
कोण होते बाबा आढाव?
बाबासाहेब पांडूरंग आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर असूनही, त्यांचे मन पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले होते. लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण जीवन संघर्ष आणि परिवर्तनासाठी वेचले. सार्वजनिक संघर्षाचा त्यांचा पहिला निर्णायक टप्पा १९५२ च्या दुष्काळात आला, जेव्हा त्यांनी धान्याच्या वाढत्या किमती आणि तुटपुंज्या शिधावाटपाविरोधात सत्याग्रह केला.
त्यांनी १९५५ मध्ये हमाल पंचायतीची स्थापना केली. ही असंघटित कामगारांना संघटित करण्याची देशातील एक मोठी चळवळ ठरली. दोन दशकांच्या संघर्षानंतर १९६९ साली राज्यात 'महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि असंघटित कामगार कायदा' लागू झाला. भारतातील असंघटित मजुरांसाठीचा हा पहिला संरक्षक कायदा होता, ज्यामुळे हमालांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर हक्कांची हमी मिळाली.
'कष्टाची भाकर' योजना
२ ऑक्टोबर १९७४ रोजी त्यांनी 'कष्टाची भाकर' योजना सुरू केली, ज्यामुळे हमाल समूहाला स्वस्तात पौष्टिक अन्न उपलब्ध झाले. ही योजना पुढे श्रमिक कल्याणाचे एक मॉडेल ठरली.
'एक गाव एक पाणवठा' चळवळ
जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत त्यांनी ही चळवळ उभी केली. दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून देत, सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या करण्याचा सामाजिक समतेचा पाया त्यांनी रचला. अंधश्रद्धाविरोधी लढा, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना आणि ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी यांसारख्या अनेक जनआधारित व अहिंसात्मक आंदोलनांसाठी त्यांची ओळख होती.
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
बाबा आढाव यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
"वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"भूमिका घेताना प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये डॉ. बाबा आढाव यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांची उणीव सदैव भासत राहील, " अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
"सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला," असं राहुल गांधी म्हणाले.
"श्रमिक, कष्टकरी, दुर्बळ आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. त्यांनी संघर्षमय जीवन जगत प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
"बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे," असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बाबा आढाव यांचे संपूर्ण कार्य म्हणजे सामाजिक न्याय आणि तळागाळातील माणसाच्या सन्मानासाठी दिलेले निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य होते.