अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडमित जत्थेदार भाई ज्योतिंदरसिंघजी यांच्या अरदासनंतर सचखंड येथील गर्भगृहातील शस्त्रे सेवेसाठी आसनावर ठेवण्यात आली असून भाविकांनी आणलेल्या गोदावरीच्या पाण्याने संपूर्ण गुरुद्वारा स्वच्छ करण्यात आले. दिवाळीच्या आदल्यादिवशी तख्तस्नान करण्याची सचखंड येथे पुरातन परंपरा आहे. मंगळवारी सकाळी मित जत्थेदार भाई ज्योतिंदरसिंघजी यांच्या अरदासनंतर घागरियासिंघ यांनी घागर घेतली व नगीनाघाट येथे गोदावरी नदीच्या घाटावर नदीचे पूजन आरती करून पाणी घेतले. नगीनाघाट येथील सरोवरसाहिबमधील पाणी भाविकांनी आपापल्या घागरीत व भांड्यात भरुन सचखंडच्या दरबारात आणले. येथे दरबारसाहिबचे सोने व चांदीचे दरवाजे भाविकांच्या सेवेकरिता बाहेर काढण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी गर्भगृहातील शस्त्रे गुरुद्वारा परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या हॉलमध्ये सेवेकरिता आसनावर ठेवली. येथे शिकलकरी समाजातर्फे शस्त्रांची विशेष सेवा करण्यात आली. पालखीसाहिब, गुरु महाराजांच्या तलवारी, तेगा, तीर, बरछा, तोफ, पिस्तूल, बंदूक, खंजिर, कटीयार आदी ऐतिहासिक शस्त्रे भाविकांच्या दर्शनाकरिता ठेवण्यात आली होती. सोन्याचा घुमट तसेच गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भाग स्वच्छ करण्यात आला. निशानसाहिबचे कापडदेखील बदलण्यात आले. दुपारी दुर्लभ ऐतिहासिक शस्त्रे भाविकांच्या दर्शनाकरिता सजवून ठेवण्यात आली होती. दिव्याविना दिवाळी : ११ नोव्हेंबरला दीपमाला महोत्सव असून यावर्षी पंजाब प्रांतात विविध ठिकाणी गुरुग्रंथ साहिबजींच्या विटंबनेच्या घटना घडल्या. त्यामुळे संपूर्ण शीख समाजात दुखवटा पाळण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही रोषणाई अथवा आतषबाजी न करता दिवाळी अत्यंत साध्या पद्धतीने धार्मिक रितीरिवाजाने साजरी करावी, असे आवाहन शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी व पंजप्यारे साहिबान, सचखंड गुरुद्वारा बोर्ड यांनी केले आहे. त्यानुसार सचखंड गुरुद्वारा व परिसरात कोणतीही रोषणाई अथवा आतषबाजी करण्यात येणार नाही.
गोदावरीच्या पाण्याने तख्तस्नान
By admin | Updated: November 11, 2015 02:52 IST