श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : गतीमंद मुलीवर बलात्कार करून मातृत्व लादल्याप्रकरणी श्रीरामपूर सत्र न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पीडित मुलीस २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. आरोपी सुरेश कारभारी वाडगे (रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा उलचत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. अत्याचारित मुलीने दिलेल्या माहितीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्यात आला.सरकारी वकील भानुदास तांबे यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सदर खटल्यात पीडित मुलगी गतीमंद असल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नव्हता. साक्षीदारांचे जबाब व डी.एन.ए. चाचणीचा अहवाल आरोप सिद्ध होण्यासाठी महत्त्वाचे पुरावे ठरले. सरकार पक्ष व आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत शिंदे यांनी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व अत्याचारित मुलीस नुकसान भरपाईपोटी २ लाख रूपये देण्याचे आदेश दिले. आरोपीने दंडाची रक्कम १ महिन्यात न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा त्यास भोगावी लागेल, असेही निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
गतिमंद मुलीवर अत्याचार; आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: November 17, 2014 03:48 IST