महाड : देशातील गोरगरीब जनतेला दोन वेळचे जेवण मिळायला हवे, मात्र आघाडी सरकारच्या राज्यात वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला उपाशी झोपण्याची वेळ आली होती. देशातील जनतेला चांगले दिवस यावेत यासाठी सेना-भाजपासोबत गेलो, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी महाड येथे चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत केले.चवदारतळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी हजेरी लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना चांगल्या सोयी-सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सभेला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, दक्षिण मुंबईचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, दलित मित्र केशव हाटे, महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार गोगावले यांनी, आपल्या नेहमीच्या शैलीत कुणाचे नाव न घेता काही मतलबी लोक कधी येतील कधी येणार नाहीत. आम्ही २० मार्चला दरवर्षी येतच राहू, असे सांगत शिवसृष्टी आणि भीमसृष्टी उभी करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी जगदीश गायकवाड यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात या कार्यक्रमासाठी शासनाकडून जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. दरम्यान, सायंकाळी आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
‘अच्छे दिन’साठी युतीबरोबरच
By admin | Updated: March 21, 2015 22:43 IST