ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी अचानक संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली. मागील महिन्यातदेखील डॉ.तोगडिया नागपूरात आले होते. तथाकथित गोरक्षकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. त्यानंतर डॉ.तोगडिया यांनी मोदी यांच्या वक्तव्याची निंदा केली होती. यावरुन संघ परिवारात तोगडिया यांच्याविरुद्ध काहीशी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी सरसंघचालकांची भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.बुधवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी डॉ.तोगडिया संघ मुख्यालयात दाखल झाले. यानंतर त्यांनी सरसंघचालकांसोबत चर्चा केली. तथाकथित गोरक्षकांच्या मुद्द्यावरुन तोगडिया यांनी आपली भुमिका सरसंघचालकांसमोर मांडली. सोबतच गोरक्षेच्या संदर्भात नवीन उपाययोजनांसंदर्भातदेखील त्यांनी डॉ.भागवत यांना माहिती दिली. विश्व हिंदू परिषदेच्या सेवाकार्याचादेखील विस्तार होत आहे.वैद्यकीय क्षेत्रात परिषदेचे काम वाढत असून तळागाळातील जनतेपर्यंत सेवाकार्याचा प्रभावी विस्तार कसा होईल, यासंदर्भातदेखील सरसंघचालकांनी मार्गदर्शन केले. तोगडिया यांनी संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचीदेखील भेट घेतली. सुमारे ४ तास तोगडिया संघ मुख्यालयात होते. भेटीसंदर्भात तोगडिया यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु तोगडिया हे गुरुवारी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.