ठाणे : ढोकाळी परिसरातील किती प्रश्न सुटले, कोणते मार्गी लागत आहेत आणि कोणत्या प्रश्नांवर काम झाले आहे, त्यावर उद्या, शुक्रवार, ५ आॅगस्टला खास चर्चा होणार आहे. लोकमततर्फे लोकमत आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही चर्चा होईल. ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या प्रभागातील किती प्रश्न सुटले, याचा मागोवा घेण्यासाठी आणि नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामांचा ऊहापोह या वेळी केला जाईल. नागरिकांना आपल्या समस्या नगरसेवकांसमोर मांडता येणार असून त्या समस्यांचे निराकरण त्यांच्याकडून करून घेता येईल. त्याबाबतची प्रगती समजून घेता येईल.पूर्वी आगरी आणि कोळी समाजाचे प्राबल्य असलेला प्रभाग म्हणूनही या परिसराची ओळख होती. मनोरमानगर, श्रुती गार्डन, आबान पार्क, एव्हरेस्ट गृहसंकुल, सुकुर गार्डन, प्राइड पार्क, पेस्ट्रीसाइड कंपनी, ढोकाळीगाव, वर्धमान गार्डन, यशस्वीनगर, बाळकुम, अग्निशमन केंद्र, रेमण्ड अॅण्ड डेम कंपनी आदी भाग येतो. या प्रभागात उच्चशिक्षित मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. मिनी स्टेडियम असून नसल्यासारखे, तर विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्येही महत्त्वाचे अभ्यासक्र म सुरू झालेले नाहीत. पार्किंग, अतिक्रमण, कचरा, वाहतूक यासारख्या इतर प्रभागांतील समस्या या प्रभागामध्येही आहेत. तसेच फुटपाथला फेरीवाल्यांचा विळखा, सवर््िहस रोडवर शोरूमच्या गाड्यांची कोंडी आदींसह इतर समस्याही येथे भेडसावतात. त्याबाबत, नेमके कोणते काम सुरू आहे, याचा लेखाजोखा ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मांडला जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. >ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडिअममध्ये सकाळी ११ वाजता हा चर्चेचा कार्यक्रम होईल. त्याला स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर आणि सहायक आयुक्त मारुती गायकवाड उपस्थित राहतील. या परिसरात केलेल्या कामांबद्दल ते आपली भूमिका मांडतील आणि मतदारांच्या मुद्दयांना उत्तरे देतील.
ढोकाळी परिसरात आज ‘लोकमत आपल्या दारी’
By admin | Updated: August 5, 2016 03:06 IST