कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आतापर्यंत तब्बल २ हजार २३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने निवडणूक केंद्रावर मोठ्या प्रमाणावर झुंबड उडणार आहे.काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी बंडखोरीच्या भीतीने आपल्या उमेदवारांची यादी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नव्हती. ६ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली. परंतु, पितृपक्ष सुरू असल्याने इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्यास उत्सुकता दाखविली नाही. त्यातच युती आणि आघाडीची बोलणी सुरू असल्याने उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. काँग्रेसने रविवारी पहिली यादी जाहीर करून ५२ जागांवरचे आपले उमेदवार निश्चित केले. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाने आपल्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत. रविवारपर्यंत १७९२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. तर, अवघ्या ३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी मात्र या संख्येत वाढ होत ती संख्या ६२वर पोहोचली आहे. दरम्यान, उद्या मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने सगळ्याच पक्षांतील उमेदवारांसह अपक्षांची उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.>>>>>>तिकीटवाटपावरून शिवसेनेचा राडा$$्रितिकीटवाटपासह विधानसभा निवडणुकांवेळच्या घटना, गटबाजीमुळे सेनेतील कल्याणच्या पदाधिकाऱ्यांमध्ये डोंबिवलीत बाचाबाची-धक्काबुक्की झाल्याची घटना सोमवारी पहाटे मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात घडली. पक्षातील सूत्रांनीच ही माहिती दिली. आधी पश्चिमेच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तर त्यानंतर कल्याण पूर्वेतील पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाली. विविध तांत्रिक मुद्द्यांसह आपापसांतील गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्यासंदर्भातील कारणांमुळे अशी घटना घडल्याचे सांगण्यात आले. दोन घटनांमध्ये शहरप्रमुख स्तरासह संघटनप्रमुख, नेते अशा एकूण चौघांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. स्वत: पालकमंत्र्यांसमोर हा गोंधळ झाल्याचेही सांगण्यात आले.
अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड
By admin | Updated: October 13, 2015 04:21 IST