मागच्या काही काळात महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालल्याचं दिसत आहे. दरम्यान, टिटवाळ्यामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही गावगुंडांनी एका महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून तुला इथे राहायचं असेल, तुझ्या बायकोला आमच्याकडे पाठव अशी धमकी त्या महिलेच्या पतीला दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कल्याणजवळ असलेल्या टिटवाला शहरामध्ये काही गावगुंडांनी एका महिलेचा विनयभंग करत तिला भररस्त्यामध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. तसेच या महिलेला वाचवण्यासाठी तिचा पती मध्ये पडला असता या गावगुंडांनी त्यालाही बेदम मारहाण केली.
हे गावगुंड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग करत असतानाचा इथं राहायचं असेल तर तुझ्या बायकोला आमच्याकडे पाठव, अशी धमकी तिच्या पतीला दिली. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रकार परस्पर वादामधून घडल्याचा दावा पोलिसांनी केला असून, या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एनसी दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मात्र सदर घटनेचा व्हिडीओ समोर आल्यास तो पाहून उचित कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.