जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेली वरिष्ठ भाजपा नेत्यांची बैठक या घटनाक्रमानंतर ही युती जागावाटपावरून कधीही तुटेल, अशी स्थिती आल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. भाजपाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांनी स्वबळावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. शिवसेना देऊ करीत असलेल्या ११९ जागांवर समझोता करण्यास भाजपा राजी नाही. जागावाटपाच्या बाबतीत दोन्ही पक्षांमधील कडवटपणा टोकाला गेल्यामुळे भाजपाची सगळी मदार आता मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदी आणि शहा यांनी १० मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा केली. युती तोडून स्वतंत्रपणे लढल्यास कोणाचे किती नुकसान होईल आणि कोण किती फायद्यात राहील, याचा अंदाज घेणे भाजपाच्या गोटात अजूनही सुरू आहे. त्यासाठीच पक्षाध्यक्ष शहा यांनी महाराष्ट्रातील विभागीय संघटन प्रमुखांना दिल्लीत पाचारण केले आहे. त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. भाजपाचा अधिकृत निर्णयही तोवर जाहीर केला जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. युतीतील या दोन्ही मित्रपक्षांचे संबंध एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या पातळीवर आले आहेत. पूर्वीच्या अनेक घटनांचे स्मरण परस्परांना करून दिले जात आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकच भाषा बोलत आहेत़ ती अशी, एकत्र लढलो तर सत्ता आमचीच आहे. स्वतंत्र लढल्याने दोघांचेही नुकसान होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एखादे पाऊल मागे घेण्याची शक्यता अजूनही आहे, असा भाजपातील सूत्रांचा दावा आहे. त्यानुसार ११९ पेक्षा दोन-चार अधिक जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात, अशी आशा दिल्लीत अजूनही शिल्लक आहे.
युती फुटीच्या उंबरठ्यावर
By admin | Updated: September 22, 2014 09:52 IST