न्यायाची मागणी : उच्च न्यायालय परिसरात थरारनागपूर : आम्हाला न्याय हवा,अशी मागणी करीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वत:ला रस्त्यावर पेटवून घेतले. हे तिघेही बापलेक जळत्या अवस्थेत न्यायालयाच्या आतमध्ये जाण्यासाठी धावत सुटले. मात्र, प्रवेश द्वारावरच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच रोखून त्यांची आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी नंतर या तिघांना मेयो इस्पितळात हलविले. उच्च न्यायालयाच्या अत्यंत संवेदनशील परिसरात आज दुपारी १२.४५ च्या सुमारास ही थरारक घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.मोहम्मद आरिफ गुलाब रसूल (वय ५५), मोहम्मद फईज मोहम्मद आरिफ (वय ३२) आणि मोहम्मद कैफ मोहम्मद आरिफ (वय २८) अशी या तिघांची नावे आहेत. ते यवतमाळ येथील रहिवासी आहे. आरिफ, त्यांची पत्नी आणि उपरोक्त दोन मुले या चौघांवर तीन दिवसांपूर्वी (८ नोव्हेंबर) गिट्टीखदान पोलिसांनी कलम ४९८ (अ), ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस त्यांना अटक करण्याच्या तयारीत असतानाच आज दुपारी १२.४५ ला ही थरारक घटना घडली. आरिफ, फईज आणि कैफ हे तिघे उच्च न्यायालयाच्या समोर आले. गेट नंबर - १ समोर काही वेळ घुटमळल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकले. त्यानंतर ‘वुई वॉन्ट जस्टीस‘ अशा घोषणा देत त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. घोषणाबाजीमुळे गेटवरील सुरक्षा रक्षक आणि इतरांचे लक्ष वेधले गेले होते. त्यामुळे पेटत्या कपड्याने न्यायालयाच्या आतल्या भागात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी गेटवरच रोखले. गुन्हा दाखलया घटनेमुळे पोलीस आणि विधी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. घटनेनंतर न्यायालयाच्या आत आणि बाहेरच्या परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला. सदर पोलिसांनी आरिफ, फईज आणि कैफ या बापलेकांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती सदरचे ठाणेदार जी. के. राठोड यांनी दिली.
तिघांनी पेटवून घेतले
By admin | Updated: November 12, 2014 01:00 IST