पाली : पालीपासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या रासळ गाव येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलाचा कोळूची रानभाजी खाऊन विषबाधा झाल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.रानभाजी खाऊन कुटुंबातील पाच ते सहा लोकांना विषबाधा झाली होती. परंतु यातील तिघांनी कमी भाजी खाल्ल्याने या भाजीतील विषबाधेचा परिणाम झाला नाही व त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. एकाच कुटुंबातील वडील राजाराम खाडे (९०), आई तारामती खाडे (७५) व मुलगा अनिल खाडे (५३) या तिघांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कामगाराने रानातून कोळूची भाजी आणली होती, ती भाजी तिघांनी खाल्ल्याने ७ जुलै २०१६ रोजी तारामती खाडे यांचे सर्वात आधी निधन झाले. ठाण्यातील शिवाजी रुग्णालय, येथे उपचार घेत असलेले राजाराम खाडे यांचे १२ जुलै रोजी निधन झाले. व त्यांचा मुलगा अनिल खाडे यांनी ज्युपिटर रुग्णालय, ठाणे येथे पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर उपचार घेताना १७ जुलै रोजी अखेरचा श्वास सोडला. या घटनेमुळे संपूर्ण रासळ गावातील व कुटुंब, नातेवाइकांवर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील अन्य तीन सदस्यांची प्रकृती स्थिर आहे. (वार्ताहर)
रानभाजी खाल्ल्याने तिघांचा मृत्यू
By admin | Updated: July 20, 2016 03:24 IST