- जमीर काझी, मुंबईसौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच महिलांसह भारतातील १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सोमवारपर्यंतच्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये तिघे औरंगाबाद येथील असून, १० दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळावरून ते यात्रेसाठी रवाना झाले होते, असे केंद्रीय हज कमिटीतर्फे सांगण्यात आले. शेख जाफर नियामत शेख, हैदर शराफुद्दीन व अल्लाउद्दीन उमर शेख अशी त्यांची नावे आहेत. रविवारी बेपत्ता असल्याचे जाहीर करण्यात आलेल्यांपैकी महिलेसह दोघांचा शोध लागला असून, ते सुखरूप आहेत. नसीरा बेगम, कादीर शेख अशी त्यांची नावे आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या मोहम्मद रफीक शेख, यास्मिनबी शेख आणि नौशाद अजुंम अन्सारी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मृतांपैकी ६४वर्षीय जाफर शेख हे औरंगाबाद येथील पैठण तालुक्यातील बालनागमधील हुसेन कॉलनीमध्ये मुलगा झाकीरसमवेत राहात होते. कमिटीमार्फत हजसाठी ते एकटेच ‘ग्रीन’ या गटातून गेले होते. त्यांच्याशिवाय हैदर शराफुद्दीन व अल्लाउद्दीन उमर शेख हेही औरंगाबाद येथील असून, त्यांचा तपशील अद्याप मिळू शकला नसल्याचे हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-ऊर रहमान यांनी सांगितले. मृत भारतीय यात्रेकरूमोहम्मद हनीफ, तब्बसुम (उत्तर प्रदेश), हसन खराज (जम्मू काश्मीर), जाफर शेख, हैदर सराफुद्दीन, अल्लाऊद्दीन उमर शेख (महाराष्ट्र), झकीरा बेगम (कर्नाटक), फातिमा बेगम, अब्दुल कादर (आंध्र प्रदेश), मोनिझा अहमद (पश्चिम बंगाल), याशिवाय प्रायव्हेट टुर्समार्फत गेलेल्या शमीम बानो, कादरबी, मोमीना इस्माईल या तिघांचा मृत्यू झाला आहे.
मक्का दुर्घटनेत औरंगाबादेतील तिघांचा मृत्यू
By admin | Updated: September 15, 2015 01:21 IST