मुंबई : नव्या बंबार्डियर लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत नुकत्याच दाखल झाल्या आणि या नव्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो कसा याची प्रतिक्षा एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)लागून राहिली. एमआरव्हीसीकडून प्रवाशांचा आॅनलाईन प्रतिसाद घेतला जात असतानाच सोमवारपासून प्रत्यक्षात बंबार्डियर लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम एमआरव्हीसीच्या चार कर्मचाऱ्यांकडून करण्यास सुरुवात झाली. मात्र या चार कर्मचाऱ्यांवर तीन हजार प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम सोपविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे काम आठवडाभर चालणार आहे. एमआरव्हीसीकडून एमयुटीपी-२ अंतर्गत दोन बंबार्डियर लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर १५ मार्च रोजी सुरु करण्यात आल्या. या लोकल सुरु होताच प्रवाशांचे या लोकलबाबत मत जाणून घेण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आणि १८ मार्चपासून त्यांच्या वेबसाईटवर आॅनलाईन प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात झाली. मात्र त्याला अल्प प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत असल्याने एमआरव्हीसीने लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया प्रवासातच घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ६ एप्रिलपासून प्रतिक्रिया मिळविण्यासाठी धडपड सुरु झाली. प्रतिक्रियांच्या कामांची जबाबदारी मात्र एमआरव्हीसीच्या चार कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली. जवळपास तीन हजार प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्याचे काम या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जवळपास आठवडाभर हे काम चालणार आहे. मात्र चर्चगेट ते अंधेरी, बोरीवली आणि विरारपर्यंत बंबार्डियर लोकल धावत असल्याने प्रतिक्रिया घेण्यासाठी चार कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवशी प्रवाशांकडून प्रतिक्रियांचे शंभर फॉर्म भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
चारच कर्मचारी करणार सर्व्हेे
By admin | Updated: April 7, 2015 04:37 IST