किनवट (जि. नांदेड) : अज्ञात तस्कराने तीन वर्षांच्या मादी बिबट्याची कातडी, पंजाची नखे, मिशाचे केस, दात काढून घेऊन फेकलेला मृतदेह अंबाडी तांडा (ता़ किनवट) शिवारात रविवारी आढळून आला. याप्रकरणी वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.पंजाखोरीच्या अलिकडील अंबाडी तांडा येथील अनिल राठोड यांच्या शेतातील विहिरीलगत हा बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. पशुधन अधिकारी डॉ़ ए़ एस़ कचरे व डॉ़ पी़ एऩ निकम यांना सोबत घेऊन वनविकास महामंडळाने मृत बिबट्याचा पंचनामा केला़ पशुधनविकास अधिकाऱ्यांनी उत्तरिय तपासणी केली़ मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची कातडी, पायाची नखे, मिशाचे केस, दात गायब होते़ त्यामुळे बिबट्याची अज्ञात शिकाऱ्याने हत्या घडवून आणल्याची शंका वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली़ मात्र पशुधनविकास अधिकाऱ्यांनी हा मृत्यू विहिरीत पडून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.दरम्यान, बिबट्याच्या अवयवाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत़ त्यात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे़ मात्र याप्रकरणी अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल जे़ डी़ पराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ (वार्ताहर)
मृत बिबट्याच्या अवयवांची चोरी
By admin | Updated: March 6, 2017 05:11 IST