शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

By रवी टाले | Updated: June 29, 2025 06:24 IST

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत.

रवी टाले कार्यकारी संपादक, अकाेला

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. यावर्षी त्याचा पुन्हा प्रत्यय आला. मान्सूनच्या नेहमीपेक्षा लवकर आगमनाचा अपवाद वगळता, इतर बहुतांश अंदाज, ‘अलर्ट’ चुकीचे ठरले आहेत. मुळात प्रारंभीचा पाऊस मान्सूनचा की मान्सूनपूर्वचा, अशीही शंका उपस्थित होत आहे. त्यातच राज्यातील आतापर्यंतचे पावसाचे चित्र अत्यंत विषम आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा नेहमीपेक्षा लवकर वाढू लागला आहे. राज्यातील २,९९७ धरणांमधील सरासरी पाणीसाठा जूनच्या तिसऱ्या आठवड्यास प्रारंभ होतानाच ४० टक्क्यांच्या घरात पोहोचला होता. नाशिक जिल्ह्यात जूनमधील २३ दिवसांत ३१५ मिलिमीटर पाऊस पडला असून, गंगापूर आणि दारणा धरणांमधील पाणीसाठा सुमारे ४३ टक्के झाला आहे. काही धरणे तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. सर्वाधिक जलसाठा कोकणात झाला आहे.

दुसरीकडे, मराठवाडा, विदर्भात पावसाची प्रचंड तूट आहे. जूनच्या पहिल्या २० दिवसांतील आकडेवारीनुसार, विदर्भात ५७ टक्के, तर मराठवाड्यात ३९ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. महाराष्ट्रातील किमान २० जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा तुटवडा आहे. पुणे जिल्ह्यात जून संपण्यापूर्वीच जूनच्या सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातील सरासरी पावसाची आकडेवारी २४८.८ मिमी एवढी दिसत आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ती सामान्यतः ११८.५ मिमी एवढीच असते. यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात किती विषम प्रमाणात पाऊस झाला, हे या आकडेवारीवरून लक्षात येते.

पावसाच्या तुटीमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी चिंताक्रांत आहेत. दोन्ही विभागांतील काही जिल्ह्यांत २५ जूनपासून पावसाचे आगमन झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

जे शेतकरी पेरण्यांसाठी पावसाची वाट बघत होते, त्यांची प्रतीक्षा संपली, तर पेरणी उरकलेल्या शेतकऱ्यांची दुबार पेरणीची चिंता दूर झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच आहे.

राज्यातील धरणांमधील जलसाठ्याची स्थितीही पावसाच्या विषमतेकडे अंगुलीनिर्देश करत आहे. जोरदार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये जलसाठा लक्षणीयरीत्या वाढला आहे.

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील २,९९७ धरणांत एकूण साठा जवळपास ४० टक्के एवढा आहे; मात्र त्यामध्ये मोठी असमानता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणात एका दिवसातच पाच हजार दशलक्ष घनफूट जलसाठा वाढला होता, तर विदर्भ-मराठवाड्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये भर पावसाळ्यात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. जून संपण्याच्या बेतात असताना राज्यात पाण्याचे ६०४ टँकर सुरू आहेत!

तज्ज्ञांच्या मते, नैऋत्य मोसमी पाऊस भारताकडे वाहून आणणाऱ्या सोमाली जेट स्ट्रीमचा जोर यावर्षी जास्त असल्याने आणि २० मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, मान्सूनने केरळ ते महाराष्ट्र हा प्रवास दोनच दिवसांत पूर्ण केला.

बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो उत्तर-पश्चिमेकडे वक्राकार प्रवास करू लागला, की कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवरील जिल्ह्यांत पाऊस होतो.

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य किंवा दक्षिणेकडील भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो भारतीय द्वीपकल्पाच्या दिशेने पश्चिमेकडे प्रवास करू लागला, की विदर्भात पाऊस पडतो.

यावर्षी जूनमध्ये पहिली स्थिती निर्माण झाल्याने कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत चांगला पाऊस झाला, तर दुसरी स्थिती निर्माण न झाल्याने विदर्भ कोरडाच राहिला! दोन्ही स्थितींचा थोडा थोडा लाभ पदरात पडणाऱ्या मराठवाड्याच्या नशिबीही विदर्भाचेच भोग आले.

गत काही वर्षांतील मान्सूनच्या वाढत्या लहरीपणासाठी प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामान बदल हे घटकही कारणीभूत आहेत. त्यावर उपाययोजना हा कोण्या एका देशाच्या आवाक्यातील विषय नाही. त्यामुळे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून, आपल्या पातळीवर शक्य ते उपाय शोधत पुढे जाण्याला पर्याय नाही.

मान्सूनचा लहरीपणा यापुढेही असाच कायम राहणार असल्याचे मान्य करून, शेतकऱ्यांनीही पीक पद्धतीत, वेळापत्रकात बदल करणे, नवीन वाण आणि तंत्रज्ञान अंगीकारणे, आणीबाणीच्या स्थितीत किमान पिके जगवण्याएवढी सिंचनाची सोय करणे गरजेचे झाले आहे.

वर्षभर पाऊस होणाऱ्या देशांच्या तुलनेत भारतासारख्या मोसमी पावसाच्या देशात हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे कठीण असते. तरी शक्य तेवढा बरोबर अंदाज वर्तविण्यासाठी भारत सरकारने हवामान खात्यामध्ये गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे.

संशोधनाला चालना देण्यासोबतच, केवळ हवामान क्षेत्रासाठी काम करणारे कृत्रिम उपग्रह आणि महासंगणकांची संख्या वाढवायला हवी.

निसर्गावर मात करणे मनुष्याला कधीच जमणार नाही; पण कितीही संकटे आली तरी, त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे, हा मनुष्यधर्म आहे. त्याला जागत या संकटालाही सामोरे जावेच लागेल!