- विजय मुंडे जालना - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु सरकार समाजाच्या भावनांशी खेळत आहे. आरक्षणाचा हा लढा तीव्र झाला असून, आता राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांतून, घराघरांतून मराठा समाज बांधव मुंबईला येणार आहेत. मागील वेळेपेक्षा तब्बल पाच पट अधिक समाज यावेळी राहणार आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
आपली नेमकी मागणी काय आहे?उत्तर : मराठा आणि कुणबी एक आहे, असा जीआर काढावा. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्न्मेंट, औंध संस्थानचे गॅझेट लागू करावे. दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि शासकीय निधी द्यावा, आदी प्रमुख मागण्या आहेत.
सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसे शक्य आहे?उत्तर : पूर्वी व्यवसायानुसार नागरिकांच्या नोंदी सरकारी दप्तरी घेतल्या जात होत्या. मराठा समाज शेती करायचा. त्यांना शेतकरी नाही तर कुणबी म्हटलं जायचं. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानसह इतर गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या नोंदी असून, त्या सरकारने मान्य करणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगानेही त्या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे गरजेचे आहे.
आजवर तीन वेळा असे आरक्षण न्यायालयाने नाकारले आहे, तरीही पुन्हा तोच आग्रह का?उत्तर : आम्ही तेच म्हणतोय, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय मागासवर्गीय आयोग ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये, असे सांगते. त्यामुळे आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे. कुणबी आरक्षणात आहेत. मराठा आणि कुणबी एकच असून, ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे.
मुंबईला जाण्यासाठी नेमके सणासुदीचे दिवस का निवडले?उत्तर : स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. आम्ही गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं, सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडं घालण्यासाठी जात आहोत. सणात अडथळा होईल, असे वाटत असेल तर आझाद मैदानावर जाण्यासाठी आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा.
मोर्चात किती लोक येतील?उत्तर : गतवेळीपेक्षा यावेळी किमान पाच पट अधिक समाजबांधव येतील. नव्हे, त्याचे गणितही लावता येणार नाही. व्यवस्था कशी आणि कोण करणार?उत्तर : वाहने, जेवण यासह इतर सर्व व्यवस्था समाजबांधवच करीत आहेत.
छगन भुजबळ म्हणतात, तुमची मागणी न्यायसंगत नसताना, लढा कशाला?उत्तर : ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच काही कळत नाही. काही ओबीसींना कशा सुविधा आहेत आणि इतर ओबीसींना कशा आहेत ते त्यांनी सांगावे. राजकीय स्वार्थासाठी सर्वच ओबीसी समाज एका बाजूला पळवीत आहेत. हिंमत असेल त्या नेत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरावी. गरीब ओबीसी समाजाने त्यांचे डाव ओळखले आहेत. राज्यातील धनगर समाज असो किंवा ओबीसी समाज असो, हा मराठ्यांच्या विरोधात नाही.