केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या सीसीपीएच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी होत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी स्वागत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहे. याच बरोबर, फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
मनमोहन सिंग सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता, पण... -मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय, हा ऐतिहासिक निर्णय आहे. १९३१ नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना होत आहे. यापूर्वी, मनमोहन सिंग सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाल्याने त्याला एससीसीसीमध्ये रूपांतरित केले आणि जनगणनेऐवजी ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, त्याचे आकडे कधीच प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे, सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल, तर या जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण मागे राहिले आहे, याचा ठोस डेटा समोर येईल. त्यामुळे योग्य व्यक्तींना योग्य सवलती देऊन आपण देशाचा आणि सर्व समाजांचा वेगाने विकास करू शकतो. या दृष्टीने हा एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे.
काँग्रेसने केवळ राजकारण केले - खरे तर, काँग्रेस पक्षानेने गेली अनेक वर्षे, अशी मागणी होत असताना, ती कधीही मान्य केली नाही. ते यावरून केवळ राजकारण करत राहिले. मात्र, मोदीजींनी याला मान्यता दिल्याने देशात देशात सामाजिक न्यायाचे एक नवीन पर्व हे मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाले आहे, असे मी म्हणेन आणि मी मोदीजींचे मनापासून आभार मानेन.