लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात वाढ होत असली, तरी विविध सवलतींमुळे परिवहनला अपेक्षित उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना भाड्यात ५० टक्के सवलत, दिव्यांग व शालेय विद्यार्थी यांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे प्रतिदिन चार ते पाच लाखांचे, तर महिन्याकाठी एक ते दीड कोटींचे नुकसान 'टीएमटी'ला सहन करावे लागत आहे.
ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतून ठाणे महापालिकेने परिवहन सेवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे, तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे ३८० बसमधून तीन ते सव्वातीन लाख प्रवासी नियमित प्रवास करतात. सन २०१५ पासून लोकानुनयापोटी तिकीट दरवाढ केलेली नाही. डिझेल आणि सीएनजी यांच्या दरात कमालीची वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थी यांना सवलत दिली आहे. त्यामुळे पालिकेला प्रतिदिन चार ते पाच लाखांचे, तर महिन्याकाठी एक ते दीड कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. सध्याच्या घडीला टीएमटीला दिवसाकाठी २८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
पालिकेच्या ७४ बस महिन्याला टीएमटीचे उत्पन्न सात ते आठ कोटींच्या घरात पोहोचते. पालिकेच्या मालकीच्या ७४ बस असून त्यापैकी सुमारे ४० बस रस्त्यावर धावतात. आनंदनगर येथून २४० डिझेल आणि १२३ इलेक्ट्रिक बस ठेका पद्धतीने सेवेत आहेत.