ठाणे : आधीच सात नगरसेवकांच्या जोरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ठाण्यात आगामी निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच दिव्यातील दोन नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात पक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील व संगीता मुंडे यांनी गुरुवारी मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघा नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकल्याची चर्चा आहे.ठाणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतही फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला होता. दरम्यान, हे दोघे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून महापालिका वर्तुळात सुरू होती. तसेच महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश करतील,असेही बोलले जात होते. अखेर, या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दिव्यातील विकासकामे व्हावीत म्हणून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मनसेतील नेत्यांवर कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
ठाण्यात मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत
By admin | Updated: July 1, 2016 04:17 IST