Sanjay Raut: नाशिकसह राज्यातील काही राजकीय नेते, आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सेक्स स्कॅण्डल आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या चर्चेनंतर खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. या सर्व प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू झाल्याची चर्चा आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हनी ट्रॅप प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले, अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे. पत्रकारांशी बोलतानाही संजय राऊत यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला.
यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे
हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाली आहे. या हनी ट्रॅपमुळे १६ ते १७ आमदार आणि चार खासदार भाजपाने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलत आहेत, हे त्यांना माहिती आहे. हनी ट्रॅपच्या सूत्रधार त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. हनी ट्रॅपद्वारे राज्य सरकारशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने यावर निवेदन करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना, कुठला हनी ट्रॅप आणला? नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे, असे सांगत ना हनी आहे, ना ट्रॅप. या संदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. कुठल्याही आजी-माजी मंत्र्याचे हनी ट्रॅप नसल्याचेही ते म्हणाले. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात तक्रार होती, ती तिने मागेही घेतली. ज्या व्यक्तीचा आपण वारंवार उल्लेख करताय तो काँग्रेस पक्षाचा माणूस आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.