मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सुचविलेल्या नाइटलाइफच्या प्रस्तावाला धरूनच असलेला इमारतीच्या गच्चीवर रेस्टॉरंटला परवानगी देण्याचा प्रस्ताव भाजपाने काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीच्या बैठकीत बुधवारी फेटाळून लावला़ मित्रपक्षांच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या गोटात संतापाची लाट उसळली आहे़ त्यामुळे युती सरकारमध्ये सुरू असलेल्या बेबनावात आणखी एका कारणाची फोडणी मिळाली आहे.मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंट बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने ते अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने २०१२ मध्ये घेतला़ समाजवादी पक्षाचे फरहान आझमी यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी सुधार समितीपुढे पाठविण्यात आला़ युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफच्या प्रस्तावाला धरून असलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे समर्थन होते़मात्र या प्रस्तावाला विरोध करण्याच्या इराद्यानेच भाजपाने व्यूहरचना आखली होती़ त्यानुसार हा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर आज मांडण्यात आला असता यावर मतदान घेण्यात आले़ परंतु शिवसेना व समाजवादी पक्षाचे सदस्य मिळून केवळ दहा मतेच या प्रस्तावाच्या बाजूने पडली़ दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेबरोबर हातमिळवणी करून भाजपाने बहुमताने हा प्रस्ताव फेटाळला़ (प्रतिनिधी)
‘टेरेस रेस्टॉरंट’चा प्रस्ताव नामंजूर
By admin | Updated: February 26, 2015 02:58 IST