महाबळेश्वर : खासगी कंपनीच्या जाहिरात फलकावर लावलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारा फलक हटविण्यात आल्याने महाबळेश्वरात तणाव निर्माण झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली; तसेच पालिकेवर मोर्चा नेण्यात आला होता.शिवसेनाप्रमुखांचा सोमवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. पंचायत समितीसमोरील चौकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी कंपनीला जाहिरात करण्याच्या मोबदल्यात देण्यात आले होते. ठेकेदाराने या कंपनीचे जाहिरातफलक चौकात लावले होते. अशाच एका फलकावर शिवसेनेचा फलक लावल्याचे दिसताच ठेकेदाराने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेथे पाठविले व तो फलक उतरविण्यास सांगितले. हा फलक काढल्याचे दिसताच तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्यास पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवसैनिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. या चौकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)
सेनाप्रमुखांचा फलक हटविल्याने तणाव!
By admin | Updated: November 18, 2014 02:17 IST