मुंबई : जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार कपिल पाटलांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने अनिल बोरनारे यांना रिंगणात उतरवले आहे. रविवारी याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा केली. शिक्षक परिषदेच्या पुणे येथील राज्य कार्यकारिणीच्या सभेमध्ये सर्वानुमते बोरनारे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. बोरनारे हे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष आहेत.शिक्षक परिषदेच्या या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठणकर, मुंबईच्या माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, बाबासाहेब काळे यांच्यासह राज्यातील सर्व विभागांतील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.मुंबईतील शिक्षकांच्या सेवाशर्तींचा प्रश्न सोडवताना शिक्षणाचे खासगीकरण-कंपनीकरण, जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग, कॅशलेस मेडिक्लेम योजना, मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याचे बोरनारे यांनी या वेळी सांगितले.भाजपा कोणाच्या पाठीशी?बोरनारे यांच्या उमेदवारीनंतर शिक्षकांचे लक्ष यापूर्वी शिक्षक परिषदेच्या पाठीशी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेकडे लागले आहे. कारण मध्यंतरीच्या काळात आमदार कपिल पाटील यांनी त्यांचा लोकभारती पक्ष संयुक्त जनता दलमध्ये विलीन केला होता. त्यानंतर संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत भाजपासोबत घरोबा केला होता. परिणामी, कपिल पाटील यांची पुरती कोंडी झाली होती. मात्र त्यानंतर सातत्याने सरकारवर आरोप करणाऱ्या पाटील यांच्या पाठीशी भाजपा राहणार की शिक्षक परिषदेला साथ देणार, याबाबत शिक्षकवर्गात जोरदार चर्चा सुरू आहे.
कपिल पाटलांविरोधात अनिल बोरनारे, भाजपाच्या भूमिकेकडे शिक्षकांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:30 IST