मंगेश व्यवहारे/ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - जिल्हा परिषदेत कुठलेही काम करायचे म्हटले की, चिरीमिरी देऊन ते काम सहज करता येते, असाच काहीसा समज रूढ आहे. परंतु अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेच्या प्रशासनात चेतना निर्माण झाल्याचे दृष्टीस पडत आहे. कुठलीही शासकीय योजना म्हटली की, कर्मचारीच तिचा बट्ट्याबोळ करतात. परंतु हागणदारीमुक्त अभियान राबविताना जिल्हा परिषदेचे अधिकारी मात्र कुठलीच तडजोड करताना दिसत नाही. होय जि. प.च्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या कक्षात शौचालय असेल तरच बोला ! अशा पाट्या लावल्याने कामासाठी येणाऱ्या आणि शौचालय नसलेल्या नागरिकांना आल्यापावली परतण्याची वेळ येत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालयांच्या कामांना गती आलेली आहे. २०१६-१७ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जि.प. मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर उपक्रम राबवित आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या टेबलावर शौचालय असेल तरच बोला! असा संदेश लिहिलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. जि.प. अध्यक्ष, सीईओ यांच्यापासून सर्व विभाग प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या टेबलावर ही पाटी लावलेली आहेत. जि.प. येणाऱ्या ग्रामस्थांना हा प्रकार काहीसा हास्यास्पद वाटतो आहे. परंतु या प्रकारामुळे सकारात्मक जनजागृती होऊन प्रभाव पडत असल्याचे अधिकारी सांगत आहे. जिल्ह्यात ७२३२६ कुटुंबाकडे शौचालय नाही. त्यामुळे व्यापक जनजागृतीसाठी एक दिवस सीईओ सोबत, एम्प्लॉई आॅफ द विक, कुटुंबस्तरावर गृहभेटी आदी अभियान राबविण्यात येत आहे. दाखल्यावरही आता शौचालयाचा स्टॅम्पग्रामपंचायत स्तरावरून जे काही प्रमाणपत्र देण्यात येते त्या प्रमाणपत्रावरही शौचालयाचा स्टॅम्प राहणार आहे. दाखले देताना शौचालय आहे किंवा नाही असे स्टॅम्प मारण्याचे आदेश सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. जि.प.त येणाऱ्या ग्रामस्थांचे ही पाटी लक्ष वेधून घेत आहे. शौचालय असेल तरच अधिकारी बोलतील? नाहीतर नाही. त्यामुळे शौचालय नसणाऱ्यांना अधिकाऱ्यांपुढे जाणे अवघडल्यासारखे वाटत आहे. सकारात्मक बदल घडून येण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. - प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
शौचालय असेल तरच बोला ! नागपुरात लागल्या पाट्या
By admin | Updated: September 26, 2016 22:03 IST