डिप्पी वांकाणी, मुंबई वाकोला पोलीस ठाण्यातील हत्या व आत्महत्येच्या घटनेनंतर मुंबई पोलीस दल खडबडून जागे झाले असून, साहाय्यक पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व पोलीस उपायुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व रजेच्या अर्जांचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तणावपूर्ण असेल तरच रजेचे अर्ज रद्द करावेत, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सर्व पोलीस उपायुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात किती अर्ज प्रलंबित आहेत, याची माहिती तत्काळ देण्याबाबतचे आदेशही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे भारती यांनी सांगितले. मुंबईतील एका पोलीस उपायुक्त अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात १०० पोलीस असतील, तर त्यातील २० टक्के लोक रजेवर वा आठवड्याच्या सुटीवर असतात. उर्वरित अधिकारी वा कर्मचाऱ्यांतील ५० टक्के नाकाबंदी व कायदा आणि सुरक्षासंदर्भात नियुक्त केलेले असतात. राहिलेले पोलीस चौकीवर तैनात असतात. उन्हाळा व दिवाळीच्या काळात रजेचे अर्ज वाढतात़ कारण या काळात मुलांना शाळेला सुट्या असतात. वाकोला प्रकरणानंतर सर्व रजेचे अर्ज मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण काही वेळा कोणाचा अर्ज मंजूर करावा व कोणाचा नाकारावा, असा प्रश्न निर्माण होतो़ रजेसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून, कुटुंबातील कोणी आजारी असेल तर तात्काळ रजा दिली जाते, पण उन्हाळी वा इतर कारणांसाठी सुटी हवी असेल तर त्याला नंतर रजा दिली जाते. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिर्केने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला रजेचा अर्ज नामंजूर झाल्यामुळे नव्हता. कारण यावर्षी त्याला ३८ रजा देण्यात आल्या होत्या. तरीही पोलीस दलात रजेमुळे असंतोष राहू नये, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटते.
रजेचा आढावा घ्या -आयुक्त
By admin | Updated: May 5, 2015 01:41 IST