संदीप प्रधान, मुंबईकेंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय शिवसेनेने अनंत गिते यांच्या सदसद्विवेकबुध्दीवर सोडला असल्याचे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, जोपर्यंत गिते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका कशी बजावायची, असा पेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. केंद्रातील मंत्रिपदाकरीता अनिल देसाई यांचे नाव शिवसेनेने निश्चित केले होते. मात्र महाराष्ट्रात किती मंत्रिमदे देणार याबाबतचे ठोस आश्वासन त्यांच्या शपथविधीची घटिका समीप आली तरी शिवसेनेला मिळाले नव्हते. अशावेळी समोरुन चालून आलेले मंत्रिपद घ्यायचे की सोडायचे याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसार्इंवर सोडला होता. देसार्इंनी मंत्रिपद नाकारले. आताही उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद सोडायचे की ठेवायचे याचा निर्णय गितेंवर सोडला असून ते अजूनही राजीनामा देण्यास राजी झालेले नाहीत. गिते मंत्रीपदावर कायम राहिल्याने राज्यात भविष्यात आपल्याला सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल, अशी आशा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या काही मंडळीच्त्या मनात पल्लवित झाली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना विरोधी पक्षाचे कामही मनापासून करू शकत नाही. शिवसेना अशा द्विधा मनस्थितीत अडकली आहे. सेनेतील हा गोंधळ वाढविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी शिवसेनेबरोबरील चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य केले. प्रत्यक्षात अशी कोणतीच चर्चा सुरु नसल्याचे सेना नेते सांगत आहेत. तर, शिक्षण खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी या महिनाअखेर होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आपल्या मित्रपक्षांना सामावून घेईल, असे वक्तव्य केले आहे.
निर्णय गितेंनीच घ्यावा
By admin | Updated: November 17, 2014 03:59 IST