लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : फलटणला जाण्यासाठी 'ती' स्वारगेट बसस्थानकात आली. जिथे नेहमी गाडी लागते, त्या फलाटावरील खुर्चीवर ती बसली होती. आरोपी तिच्याजवळ आला. गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे, म्हणत शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला. हादरवून टाकणारी ही घटना पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडली. स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणाची पुणे पोलिसांकडून माहिती देण्यात आली. आरोपीने आधी तरुणीचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला बसमध्ये नेऊन अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.
स्वारगेट, छत्रपती शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही ठिकाणी मिळून ४८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि ४६ सुरक्षारक्षक असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. आधी आरोपी तरुणीच्या बाजूला जाऊन बसला. ही मुलगी पुण्यात कामाला आहे. ती इथून फलटणला गावी चालली होती. सकाळी साडेपाच पावणे सहादरम्यान ही घटना घडली आहे. ती स्वारगेट बसस्थानकात बसची वाट बघत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला. आधी आरोपी तिच्या आजूबाजूला फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसतो. नंतर तिच्या शेजारी जाऊन बसला. दोघांचं बोलणं सुरू असताना बाजूला असलेला एक माणूस उठून जातो. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली.
तरुणी बसमध्ये चढली.. आरोपीने दरवाजा लावलाती बसमध्ये चढली. अंधार असल्यामुळे ती टॉर्च लावायला गेली. त्यानंतर आरोपीही मागून बसमध्ये चढला. दरवाजा लावून घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा उपयोग तरी काय?बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी, मौल्यवान ऐवज चोरणे या घटना वारंवार घडत आहेत. आता तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीचा व सुरक्षारक्षकांचा उपयोग काय? असा सवाल विचारला जात आहे.
कुठे चाललीये ताई... बस तर इथेच येतेकुठे चाललीये ताई, असे आरोपीने तिला विचारले. मुलगी म्हणाली मला फलटणला जायचं आहे. तर आरोपी म्हणाला की, ती बस इथे लागत नाही. ती तिकडे लागलेली आहे.त्यावर मुलगी त्याला म्हणाली की, नाही. बस इथेच लागते. म्हणून मी इथे बसलीये. त्यावर आरोपी मुलीला म्हणाला की, बस तिकडे लागलीये. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता. अंधार पाहून आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला की, ही रात्री उशिराची बस आहे.