पुणे : मुठा नदीतून किती पाणी सोडल्यानंतर शहरात कोणत्या भागात पूर येण्याची शक्यता आहे, याबाबत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पूर नियंत्रण आराखड्याबाबत संशयाचे चित्र निर्माण झाले आहे. या आराखड्यात मुठा नदीत ५५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतर पूर येण्याची शक्यता वर्तविली असताना प्रत्यक्षात मात्र, ३२ हजार क्युसेक्स पाण्यातच शहरात दोन ते तीन ठिकाणी पाणी शिरले. त्यामुळे कोणत्या स्थितीच्या आधारावर पालिकेने पूर स्थितीचे नियोजन केले असा सवाल उपस्थित केला जात आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातून मुठा नदी वाहते. खडकवासला धरणातून मुठा नदीत जास्तीतजास्त १ लाख क्युसेक्स पर्यंत पाणी सोडले जाऊ शकते. तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत या धरणातून जास्तीतजास्त ६० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे विठ्ठलवाडी येथील अनेक सोसायट्या पाण्याखाली जातात. ही बाब लक्षात घेऊन अशा स्थितीमध्ये पूर स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कशा प्रकारे कार्यपद्धती असावी यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून पूर नियंत्रण आराखडा व आदर्श पद्धती कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यात शहरातील ३३ ठिकाणांना पुराचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले असून, सिंहगड रस्ता परिसर तसेच दत्तवाडी येथील भागात ५५ हजार क्युसेक्सला पुराचे पाणी शहरात घुसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापूर्वी २० हजार क्युसेक्सला या भागांना धोक्याची सूचना देणे आणि ४० हजार क्युसेक्सला त्यांचे स्थलांतरण करणे अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अवघ्या ३२ हजार क्युसेक्स पाण्यातच सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायट्या तसेच दत्तवाडी मधील ५ घरे पाण्याखाली आल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
पूर आराखड्याबाबत संशय
By admin | Updated: August 5, 2016 00:44 IST