नागपूर : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे तावडे यांनी शाळाव्यवस्थापन हस्तांतरणाचा आदेश रद्द करण्याच्या तक्रारीवर सुनावणी आयोजित केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या विषयीच्या पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत या प्रकरणावर तावडे यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष संबंधित रिट याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्या शिक्षण संस्थेला वरीलप्रमाणे अंतरिम दिलासा देतानाच तावडे व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले. दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) येथील वसंतराव नाईक मागासवर्गीय शिक्षण संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. साईबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील निपाणा (ता. मोटाळा) येथे संचालित करमवीर भिकामसिंग पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन याचिकाकर्त्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. हे हस्तांतरण महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन हस्तांतरण) कायदा-१९७१ अंतर्गत झाले आहे.असे असतानाही तावडे यांनी साईबाबा मंडळाचे अध्यक्ष व शाळा मुख्याध्यापकाच्या दबावाखाली व्यवस्थापन हस्तांतरणाचा आदेश रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. तावडे यांना कायद्यांतर्गत सुनावणी घेण्याचे काहीच अधिकार नाहीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
शाळा व्यवस्थापन हस्तांतरणाच्या कार्यवाहीस स्थगिती
By admin | Updated: July 21, 2015 01:41 IST