मुंबई : मुंबई महापालिकेने ‘ए’ वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी स्थगित केला. या योजनेत रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या मोटारींकरिता शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता.कुलाबा, कफ परेड या परिसरात महापालिकेने ही ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्याचे ठरवले होते. येथील इमारतींमधील रहिवाशांच्या मोटारी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या केल्या जातात. दिवसा या भागात वाहने उभी करण्याकरिता शुल्क आकारणी केली जात होती. रात्री रस्त्यावर वाहने उभी करण्याकरिता आतापर्यंत शुल्क आकारले जात नव्हते. मात्र नव्या धोरणात रात्री मोटारी उभ्या करण्याकरिता शुल्क आकारणी केली जाणार आहे. याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. आमदार राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली ‘ए’ वॉर्ड रेसिडेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या परिसरातील रहिवाशांच्या मोटारींच्या पार्किंगची कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता महापालिकेने हा निर्णय लादला आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे फडणवीस यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना ही योजना स्थगित करून सुनावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेची ही योजना स्थगित करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
नवीन ‘पे अँड पार्क’ धोरणाला स्थगिती
By admin | Updated: January 30, 2015 05:22 IST