मुंबई : गैरहजर व अपहार प्रकारामुळे निलंबित अथवा बडतर्फ करण्यात आलेल्या चालक-वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांची अटी व शर्तीनुसार एसटी महामंडळात पुनर्नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी महामंडळाने या प्रक्रियेला ‘कुटूंब सुरक्षा योजना’असे नाव दिले आहे. मात्र भविष्यात या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला. अपहार किंवा गैरहजेरीमुळे बडतर्फ अथवा निलंबित झालेल्या एसटीतील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांच्या कुटूंबियांना नाहक बदनामी तसेच आर्थिक कुचंबनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटूंबाला पुनश्च: आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्याच्या चुका सुधारण्याची शेवटची संधी म्हणून एसटी महामंडळात त्या कर्मचाऱ्यांना पुनर्नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एसटीच्या संचालक मंडळाकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. ४५ वर्षे वयाच्या आतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या बडतर्फ अथवा निलंबित केलेल्या तारखेला देय असलेल्या वेतनात काही प्रमाणात कपात करुन त्यांची पुर्ननियुक्ती करण्यात येईल. मात्र त्यांच्याकडून यापुढे पुन्हा तशाचप्रकारचा गुन्हा घडल्यास थेट बडतर्फीला सामोरे जावे लागेल. जर न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन तडजोड करुन पुनर्नेमणूकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर एसटी महामंडळात सामावून घेतले जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. दरम्यान, एसटीत अपहार, गैरहजेरीमुळे निलंबित अथवा बडतर्फीची राज्यात जवळपास अकरा हजार प्रकरणे आहेत. त्यामध्ये एकाच वाहकाची एकापेक्षा जास्त प्रकरणेही आहेत. त्यानुसार एकच वाहक तीनपेक्षा जास्त प्रकरणात अडकला असेल तरो तो पुन:नियुक्तीस पात्र ठरणार नसल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सगळ्या अटी पूर्ण करुन किमान तीन ते चार हचार चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी पुन्हा सेवेत येतील,असा अंदाज एसटीकडून वर्तविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
एसटीचे निलंबित, बडतर्फ चालक-वाहक सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरु
By admin | Updated: August 15, 2016 04:25 IST