Suresh Dhas on Dhananjay Munde Resign: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. केजचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरलं होतं. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावर बोलताना सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं.
"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ९० टक्के समाधान झाले आहे. त्यांचा राजीनामा होणं ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मागणी होती. सुरेश धस, देशमुख कुटुंबिय, मस्साजोग गाव किंवा केज तालुका एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हते. तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ठेच पोहोचली होती. सभागृहातल्या भाषणात मी संतोष देशमुख यांना कसं मारलं याचं वर्णन केलं होतं. बरेचसे लोक बोलत होते की सुरेश धस अति बोलत आहेत. मला सुद्धा बोलले की तुम्ही अति बोलत आहात. त्यावेळी मी अति बोलत नाही असं सांगितलं होतं. संतोष देशमुख यांना ज्या ज्या गावात फिरवून मारलं होतं त्या सगळ्या गावांमधून मी माहिती घेतली होती," असं सुरेश धस म्हणाले.
देवाची गाठी लागत नाही पण न्याय मिळतो
"काल वायरल झालेल्या फोटोची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे. या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पॉझिटिव राहिलेले आहेत. एफआयआर दाखल होण्यापासून ते धनंजय मुंडे यांची विकेट पडण्यापर्यंत खमके मुख्यमंत्री काय असतात हे आम्ही पाहिलेले आहे. देवाची गाठी लागत नाही पण न्याय मात्र मिळतो," असंही सुरेश धस म्हणाले.
धनंजय मुंडे हे आकाचे आका - सुरेश धस
"संतोष देशमुख यांना एवढ्या क्रूरपणे मारले आहे. त्यामुळे या सर्व लोकांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही घटना झालेली नाही. या प्रकरणातील जे तरुण आहेत, त्यांना वाटत होतं की विष्णू चाटे हा आमचा बॉस आहे आणि आका आमचा बाप आहे. वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्याचा बाप झाला होता. संतोष देशमुख यांना मारहाण करताना सुदर्शन घुले म्हणत होता की, मी तुझा बाप आहे असं म्हण, नाही तर मी पुन्हा मारेन. या सर्वांचे आका हे धनंजय मुंडे होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते," असं सुरेश धस यांनी म्हटलं.